मुलांना शिक्षण अती कमी वयात द्यावे का?
शिक्षण म्हणजे क्षणा क्षणाला शिकणे, नव्या दिशेला घेत भरारी उडणे.
आपल्या भारतीय संस्कृतीत गर्भसंस्कार ही संकल्पना सांगीतली आहे म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ आईच्या पोटात असतानाच मुल या जगात आलेले असते. तेंव्हाच मुलावर संस्कार सुरु होतात. आपण महाभारतातील अभिमन्युची कथा ऐकतो ज्यात अभिमन्यु युध्दातील वापरल्या जाणाऱ्या चक्रव्युव्हाचे शिक्षण गर्भात असतानाच घेतो. असा संदर्भ येतो. आपण अशा किती तरी महान व्यक्तींच्या कथा ऐकलेल्या आहेत. यातून हेच लक्षत येते कि शिक्षणसंस्कार हे अगदी जीव अस्तित्वात आल्यापासून सुरु होतात. ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
‘शिक्षण म्हणजेच संस्कार’ शिक्षण आणि संस्कार ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत.’ शिक्षणातून संस्कार केले नाहीत किंवा संस्कारातून शिक्षण दिले नाही असे जर झाले तर असे बालपण त्या बाळाच्या व्यक्तिमत्व विकासाला घातक ठरु शकते.
नऊ महिन्यांचे गर्भसंस्कार घेवून जेव्हा बाळ या जगात येतं आणि स्वत:च्या पंचेंद्रियांनी हे जग पाहू लागतं तेंव्हा त्या बाळाने स्वत: घेतलेला पहिला श्वास आणि तीथून सुरु झालेला त्याचा स्वअस्तित्वाचा झगडा ही शिक्षणाची खरी नांदी ठरते. शिक्षण हे औपचारीत आणि अनौपचारीक अशा दोन विभागात विभागले आहे. शालेय शिक्षण हे औपचारीक शिक्षण ज्याला शासनाने आणि शिक्षणतज्ञांनी ठरवून दिलेल्या नियमांची तटबंदी असते. अनौपचारीक किंवा सहजशिक्षण हे घरातूनच सुरु होते. ज्याला रुढार्थाने बालसंस्कार असे संबोधतात.
मुल जन्म घेतल्याक्षणीच शिकू लागते. योग्य आरोग्य, संगोपण, पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व जवळच्यांचा सहवास मिळाला तर मुलं वेगाने वाढू लागतं. सुरुवातीला मुले अनुकरणाने शिकतात. पहिले दोन वर्षे तर मुलाचं मन हे एखाद्या स्पाँज सारखं असतं. त्यात समोर काहीही ठेवा ते आतखोल मनामध्ये साठवून ठेवतं. त्यामुळे हि दोन वर्षे आई-वडील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी जागरुकतेने मुलाच्या आजुबाजुला वातावरण निर्मीती केली पाहिजे. लहान मुलाला स्पर्शाची भाषा कळते. आईचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतो. त्यामुळे मुलाचे मन निर्भय, सुरक्षित व खंबीर घडवण्यासाठी बाळाला जास्तीत जास्त सहवास देणं गरजेच असतं. आजच्या ह्या जमान्यात आणि स्वातंत्र्याच्या गैरसमजामध्ये आई दिड-दोन महिन्याच्या बाळाला पाळणा घरात ठेवून नोकरीववर जाते. त्यामुळे मुलांची मानसीक गरज, आईच्या दुधातुन मिळणाऱ्या सकस आहाराची गरज पुरविली जात नाही आणि ही कमतरता आयुष्यभरासाठी त्या मुलाच्या मानसिक आणि बौध्दिक कमकुवतेकडे आणु शकते. मुलांचा शारिरीक, बौध्दिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास हा एकसंघ पद्धतीने होत असतो आणि हा सुरुवातीला वेगाने होतो. मुले सुरुवातीची काही वर्षे त्यांच्या जवळच्या व्यक्तींचे अनुकरण करुन त्यानुसार वागतात. म्हणून ह्या अनौपचारीक शिक्षणात म्हणजे घरगुती वातावरणात सजगता असणं खुप गरजेचं आहे. ह्यालाच सहज शिक्षणही म्हणतात. मोठ्या माणसांनी स्वत:च्या भावनांवर ताबा मिळवून मुलांसमोर आदर्शवादी वागणं हे प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे. कारण त्या मुलाला आपणच सगळ्यांच्या संमतीने ह्या जगात आणतो, मग त्या मुलाला निरोगी, आनंदी, पोषक वातावरण देणं हेही आपलंच कर्तव्य असतं. हल्ली नवरा – बायको अशा दोन व्यक्तींची कुटूंब जास्त आहेत. त्यात जर दोघंही नोकरी करणारी असतील तर अशा वेळेस प्रश्न निर्माण होतो तो निकोप सहवासाचा!
प्राचीन ग्रंथाचा संदर्भ –
भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये वैदीककाळातील शिक्षण पद्धतींचा उल्लेख येतो त्यात बालपणीच्या सहज शिक्षणाचा म्हणजेच बालसंस्कारांचा! त्यानंतर गुरुकुलात राहून मिळणाऱ्या शिक्षणाचा जीथे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवन कलांचे शिक्षण मिळायचे. त्यानंतरच्या काळातील उदा. घेतले म्हणजे संत ज्ञानेश्वरांचे तर त्यांनी औपचारीक शिक्षण घेतलेला उल्लेख कुठेही येत नाही आणि तरी सगळ्या जगाला जगण्याचे आदर्श तत्व शिकवणाऱ्या गीतेचा भावार्थ अनुवाद ज्ञानेश्वरांनी अवघ्या सोळाव्या वर्षी केला असे अपवादी आदर्श उदाहरणं जेव्हा आपण बघतो तेव्हा ‘अवतारी पुरुष’ या संकल्पनेची सत्यता जाणवते, पण अशी उदाहरणे शेकडो वर्षांमध्ये एखादीच असतात. आपण सर्व सामान्यांचा विचार करता आपल्याला सद्य परिस्थीतीत वर्तमान काळात उपलब्ध असलेल्या वातावरणाच्या सोयींचाच सारासार विचार करुन त्यातील उपयुक्त समाधान शोधणं गरजेचं असतं.
महाराष्ट्रातील बालशिक्षण विषयक अभ्यासपूर्ण संकल्पना मांडणाऱ्या ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांचे कार्य आणि त्यातून मांडले गेलेले सिद्धांत विचारात घेणं आवश्यक आहे. अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पनांतून बालवाडी कशी चालवावी, बालवाडीतील गोष्टी, बडबडगीते, कृतीगीते, प्रबोधिका मांडलेल्या आहेत. लहान बालकांच्या चंचल वृत्तीला समजून घेता आले तर त्याला वळण लावता येते. शिशुशाळा, बालकमंदिरातून दिले जाणारे शिक्षण अनौपचारिक स्वरुपाचे असावे. शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी असावी. कारण या वयातील बालकांची अवधान कक्षा कमी असते. त्यामुळे तासिकाही कमी कालावधीच्या असाव्यात. कृतींवर भर द्यावा. शिक्षण ही प्रक्रीया निरंतर चालत असते. जीवनमानात होणारे परिवर्तन होण्यासाठी शिक्षण प्रक्रीया काल सुसंगत होत असते. दैनंदिन जीवनात परिवर्तनाचे जे प्रवाह येतात, त्याच अनुषंगाने शिक्षण प्रक्रियेतही हे परिवर्तनाचे प्रवाह प्रतिबिंबीत होतात. सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असल्याने जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा प्रवाह दिसून येतो. याचा उपयोग करुन अध्ययन, अध्यापन आणि मुल्यमापन प्रभावी बनून एकूण शिक्षण प्रक्रीयेचा दर्जा उंचावला पाहिजे.
सध्याची विभक्त कौटुंबिक अवस्था पाहता केंद्र शासनाने राष्ट्रीय अर्ली चाईल्डहूड अँड चाइल्ड केअर एज्युकेशन (ECCE) धोरण जाहीर केलेले आहे. त्यात स्पष्टपणे निर्दश केलेला आहे. शुन्य ते सहा वयोगटातील बालकांचा सातत्यपूर्ण विकास घडविणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र शासनाने द्रष्टेपणाने याची गरज ओळखून राज्य घटनेच्या पंचेचाळीसाव्या कलमात बालक सहा वर्षाचे होईपर्यंत इ सी सी ई सुविधा पुरविली पाहिजे अशी तरतुद राज्य शासनाने केली आहे. शिक्षणहक्क कायद्यामध्ये अकराव्या कलमातही याचा पुनरुच्चार केला आहे. या पाया बांधणीच्या शिक्षणालाच पूर्व प्राथमिक विभाग म्हणतात. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणवेत्यांच्या मांदियाळीत गिजुबाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, डॉ. रमेश पानसे या अलौकिक शिक्षण तज्ञांनी त्यांचे आयुष्य खर्ची केले आहे.
पुर्व प्राथमिक शाळांची गुणवत्ता ही केवळ भौतिक सुविधांवर आधारीत नसून राज्य शासनाने सांगीतलेल्या आठ निकषांच्या गाभा घटकांशिवाय पालक भेटी, शिक्षक प्रविणता, यावर आधारीत शिक्षण, कला आधारीत समुपदेशन इ. शिक्षणातील नव विचारांचा प्रत्येक पुर्व प्राथमिक वर्गात संचार व्हावा. पुर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा बालमानसशास्त्र, बालविकास, बुद्धीविकास, गुणवत्ता विकास, पालक समुपदेशन या विषयांचा अभ्यास असणं गरजेचे आहे.
मारिया मॉन्टेसरी या जागतिक स्तरावरील सर्वप्रथम बाल शिक्षण व पूर्व प्राथमिक बाल शिक्षण विषयक संकल्पना मांडणाऱ्या महान शिक्षणतज्ञ होत्या. ज्यांनी बालविकासासाठी अनेक वस्तुनिष्ठ प्रयोग यशस्वी केले होते व आजतागायत त्यांच्या मार्गदर्शनातून निर्माण झालेल्या शिक्षण पद्धती ह्या बालविकासामध्ये आणि पुर्व प्राथमिक वर्गांमध्ये लोकप्रिय आहेत. बालक हा काही रेसचा घोडा नव्हे. प्रत्येक मुल हे स्वत:ची ओळख घेवून जन्माला येतं. ती आपण ओळखून त्या बालकाचा विकास करुन त्याच्या सर्व क्षमता विकास करणं हेच पुर्वप्राथमिक शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे.
सौ. विजयालक्ष्मी मणेरीकर
संचालक, शिक्षण समन्वयक
ग्लोबल व्हिजन स्कुल, अंबड, नाशिक.
मो. ९८२२६८३७९९
ई मेल –
manerikarvs@gmail.com
No comments:
Post a Comment